
अंधेरी येथील गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला दोन्ही पुलातील उंची समसमान केल्यानंतर आज सायंकाळी 5 वाजल्यापासून जुहू दिशेने अंधेरीपर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे अंधेरी, सांताक्रुझ आणि एकूणच पश्चिम उपनगरातील वाहतूककाsंडी फुटण्यास मदत होणार आहे. सध्या या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना परवानगी असून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असणार आहे. अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत.