श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या जीर्णोद्धारादरम्यान मंदिरातील देवाची जुनी मेघडंबरी काढून त्याठिकाणी नवीन मेघडंबरी बसविण्यात आली आहे. या नव्या मेघडंबरीत विसावलेले सावळ्या विठ्ठलाचे गोजिरवाणे रूप अधिक खुलले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱयातील या मेघडंबरीसाठी 225 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने दर्शनासाठी पंढरीत भाविकांची गर्दीदेखील वाढू लागली आहे. वारीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना विठू माउलीचे नवे रूपडे पाहायला मिळणार आहे.
नवीन लाकडी मेघडंबरी ही ह.भ.प. विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्त्वावर विठ्ठलास 160 किलो वजनाची, तर रुक्मिणीमातेस 110 किलो वजनाची देऊ केली आहे. याचे मूल्य 30 लाख 50 हजार रुपये इतके आहे. त्या मेघडंबरीला मढविण्यासाठी एका दानशूर भक्ताने 2 कोटी रुपये किमतीची 225 किलो चांदी दिली आहे. ही चांदी लाकडी मेघडंबरीवर मढविण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने ठरलेल्या नियोजनानुसार आषाढी यात्रेपूर्वी म्हणजेच 4 जुलै रोजी सायंकाळी गाभाऱयात मेघडंबरी बसविण्यात आल्या आहेत.
यावेळी समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सदस्य उपस्थित होते.