Solapur News : वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू, पशुपालकाचं लाखो रुपयांच नुकसान

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका पशुपालकाचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्यामध्ये उतरलेल्या 24 म्हशींचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.

गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या 24 म्हशी नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गावाबाहेर जात होत्या. गावाबाहेर जाण्यापूर्वी गावात असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या, मात्र त्याचवेळी विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती. तार पाण्यात पडल्यामुळे विजेचा करंट पाण्यामध्ये उतरला होता. परंतु भजनावळे यांना त्याची कल्पना नव्हती. काही समजण्याच्या आत म्हशी पाण्यात उतरल्या आणि डोळ्यादेखत विजेचा शॉक लागल्याने 24 म्हशी मरण पावल्या. चार म्हशींना वेळीच पाण्यात जाण्यापासून रोखल्याने त्यांचा जीव वाचला आहे. सदर घटनेची माहिती तत्काळ महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून भजनावळे यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.