प्रसाद नायगावकर
देशामध्ये अथवा राज्यामध्ये कोणतीही योजना आमलात आणायची असेल, तर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जातो. परंतु राज्य सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सारासार विचार न करता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा केली. योजना जाहीर झाल्यापासून राज्याच्या विविध भागातून तक्रारी समोर येत आहेत. फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती अॅपचा पर्याय राज्य सरकारने दिला आहे. मात्र या अॅपमधून आदिवासी बहुल असलेला राळेगाव तालुकाच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातवरण असून, ‘राळेगाव काय महाराष्ट्राबाहेर आहे का.” असा संतप्त सवाल महिलांनी मिंध्यांना विचारला आहे.
लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता महायुतीला लाडक्या बहिणींची आठवण झाली आहे. येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात “लाडकी बहीण योजना” आणली आहे. यानुसार दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात योजनेसाठी कागदपत्रे काढण्याची लगबग सुरू झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू, तहसील तसेच तलाठी कार्यालयात महिलांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नारीशक्ती अॅप तयार करण्यात आले आहे. मात्र हे अॅप सतत डाउन होत असल्यामुळे महिलांना फॉर्म भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अॅपमध्ये तालुक्याचा पर्याय निवडताना यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी 15 तालुक्यांचाच समावेश करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने ज्या तालुक्यातील महिलांना या योजनेची गरज आहे, अशा आदिवासी बहुल राळेगाव तालुक्याचा अॅपमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे संपूर्ण तालुक्यात संतप्त भावना उमटत आहेत.