राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन ‘रामकृष्ण हरी दुधाला भाव तरी द्या रे’, ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ अशा गगनभेदी घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, राजन साळवीही उपस्थित होते.
दूध भुकटी धोरण, शेतकऱ्यांचे होते मरण, अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना द्या हक्काचे दर , अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव, दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला घेरल.
‘रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी’ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने #VidhanBhavan pic.twitter.com/F14WDCGGau
— Saamana (@SaamanaOnline) July 4, 2024
दुधाला योग्य भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी लागला दारोदारी सरकार स्वतःचे पोट भरी, दुधाला भाव तरी द्या रे, शेतकरी फिरतोय दारोदारी, सरकार अदानीचे पोट भरी अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
राज्यातील बळीराजा आपल्या पिकाला योग्य भाव, दुधाला भाव, नुकसान भरपाई आणि सरकारच्या अन्य योजनांच्या प्रतिक्षेत पुरता खचलाय. विरोधकांनी बळीराजाचा आवाज बनून विधानभवनात शेतकरीविरोधी सरकारचा निषेध व्यक्त केला.
राम कृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी! शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, दुधाला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो; अशी घोषणाबाजी करून गेंड्याचे कातडे ओढलेल्या सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकारने तत्काळ पावलं टाकावी, अशी आग्रही मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.