वर्ल्डकप घेऊन टीम इंडिया मायदेशी दाखल, दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

टी-20 वर्ल्डकप घेऊन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास टीम इंडियाच्या खेळाडूंना घेऊन विशेष विमान दिल्लीमध्ये दाखल झाले. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकल्याने खेळाडूंच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली होती.


दिल्ली विमानतळावर चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. टीम इंडियाचे खेळाडू टर्मिनल-3मधून बाहेर पडताच इंडिया… इंडिया… इंडिया… इंडिया असा जयघोष चाहत्यांनी सुरू केला. विमानतळावरील इतर सोपस्कार पार पडल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलकडे रवाना झाली.

दिल्ली विमानतळावर चाहत्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफसह आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमध्येही विश्वविजेत्या खेळाडूंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. याठिकाणी खेळाडूंसाठी मेजवाणीचेही आयोजन करण्यात आले आहे.

काही काळ येथे आराम करून खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी रवाना होतील. मोदींच्या भेटीनंतर खेळाडू दुपारच्या सुमारास मुंबईकडे मार्गस्थ होतील. मुंबईत महाविजयाची अवघी एक कि.मी. अंतराची शोभायात्रा काढली जाणार आहे. मुंबईत नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम येथे खुल्या बसमधून विजययात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर टीम इंडियाचा बीसीसीआयच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.

जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपला

शनिवारी थरारक संघर्षात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियाने आपल्या जगज्जेतेपदांचा दुष्काळ संपवताना 13 वर्षांनंतर जगज्जेतेपद तर 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपचे दुसऱ्यांदा जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. 17 वर्षांपूर्वी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. हा पराभव कोट्यवधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाच्या सहा महिन्यांनंतरच टीम इंडियाने टी-20 क्रिकेटचे पहिलेवहिले जेतेपद अत्यंत रोमहर्षक लढतीनंतर काबीज करत हिंदुस्थानी चाहत्यांना जगज्जेतेपदाची अनोखी भेट दिली होती.