![narendra modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/narendra-modi-1-696x447.jpg)
केंद्र सरकारने तब्बल तीन आठवडय़ांनी बुधवारी सुरक्षा, अर्थ अशा विविध कॅबिनेट समित्यांची स्थापना केली. या वेळी आपल्याला स्पष्ट बहुमत नाही हे दडपण घेऊन वावरणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदा प्रथमच एनडीएमधील मित्रपक्षांची आठवण झाली आहे. दोन कुबडय़ांवरील या सरकारला मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही हे लक्षात घेऊन यंदा 2014 नंतर प्रथमच या समित्यांमध्ये इतर पक्षांच्या मंत्र्यांना लक्षणीय प्रमाणात सामावून घेतले.
मित्रपक्षांचे सदस्य
राजकीय कामकाज समितीत तेलगु देसमचे के राममोहन नायडू आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी हे सदस्य आहेत. आर्थिक व्यवहार समितीत जदयुचे लालन सिंह सदस्य आहेत तर चिराग पासवान यांना गुंतवणूक समितीत स्थान दिले आहे. आर्थिक व्यवहारविषयीच्या समितीमध्ये पंतप्रधानांबरोबरच संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांचा समावेश आहे.
मोदी म्हणतात, कश्मीरमधील दहशतवादी हल्ले घटले
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना जम्मू-कश्मीरमधील रियासी भागात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आणखी दोन ठिकाणी हल्ले झाले. असे असतानाही जम्मूमध्ये गेल्या 10 वर्षांत दहशतवादी हल्ले घटल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. आज राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. जम्मू आणि कश्मीरमधील दहशतवाद हा अंतिम टप्प्यात असल्याचेही मोदी यांनी ठामपणे सांगितले.