मलईदार पोस्टिंग मिळावी म्हणून मुंबईतील बरेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवळ आलेली आपली एसीपी, डीवायएसपीची बढती नाकारत असून हा मोठा बढती (सेटिंग) घोटाळा असल्याचे पोलीस दलात बोलले जात आहे. ज्यांचा कुणी वाली नाही, गॉडफादर नाही अशा कर्तबगार पोलीस निरीक्षकांवर अन्याय होत असून आमची एकदा तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करा, काम करायची आम्हाला संधी द्या, अशी मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाच्या स्पर्धेत असलेले निरीक्षक करीत आहेत.
मोक्याची व मलईदार पोस्टिंग मिळविण्यासाठी बरेच पोलीस निरीक्षक आपले वृद्ध आई-वडील आजारी आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याजवळ राहणे गरजेचे आहे किंवा मुलांच्या शिक्षणाची समस्या आहे, तरी एसीपी किवा डीवायएसपीची तूर्त बढती देऊन मुंबईबाहेर पाठवू नका, असा अर्ज करून आपली बढती रोखून ठेवत आहेत व सेटिंग करून मलईदार पोस्टिंग मिळवत आहेत. एका वरिष्ठ निरीक्षकाला सलग दोन दोन – तीन तीन मलईदार पोलीस ठाणी दिली जात आहेत. ज्या निरीक्षकाला एसीपी, डीवायएसपीची बढती कौटुंबिक कारणामुळे नको असते त्याला संवेदनक्षम पोलीस ठाणे सांभाळण्यासाठी कसे काय दिले जाते? तेथे तो कसा काय तंदुरुस्त होतो हे सारे कोडे आहे, असेही बोलले जात आहे.
एसीपी, डीवायएसपीची बढती नाकारण्यासाठी बरेच निरीक्षक स्वतःविरुद्ध चौकशीही लावून घेतात व आपली बढती प्रलंबित फाईलमध्ये अडकवून ठेवतात. यासाठी हे निरीक्षक मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱयांना (बाबू लोक) मॅनेज करतात. त्यामुळे सध्या एसीपी, डीवायएसपी बढती घोटाळय़ाची मुंबई पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे.
भ्रष्ट वरिष्ठ निरीक्षकांची ‘एसीपी’च्या संभाव्य यादीत लवकर नावे येतच नाहीत. कधीही शिक्षा न झालेल्या निरीक्षकाची बढती जवळ आली की, त्याची विभागीय चौकशी सुरू होते. त्याला किरकोळ शिक्षा दिली जाते. मग अशा वादग्रस्त निरीक्षकाची मुंबईसारख्या संवेदनक्षम शहरातील पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कशी काय नेमणूक होते, असा सवाल पोलीस दलातूनच केला जात आहे.
एसीपी, डीवायएसपीची बढती नाकारणाऱया पोलीस निरीक्षकांची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चौकशी करावी. या सेटिंग घोटाळय़ात लक्ष घालावे व ज्यांची कधी एकाही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली नाही अशा कार्यक्षम निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी मुंबई पोलीस दलातून करण्यात येत आहे. मलाईदार पोस्टिंग मिळवून गब्बर झालेले पोलीस अधिकारी मंत्रालयात ‘सेटिंग’ लावून आपणास हवे ते पोलीस ठाणे मिळवतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे व सामान्य पोलिसांना न्याय दिला पाहिजे असे एका ज्येष्ठ अधिकाऱयाने दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.