महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणात छापे; 327 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 15 अटकेत

ड्रग्ज बनवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची तस्करी करणाऱया कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हिंदुस्थानातील रॅकेटला भाईंदर पोलिसांनी जबरदस्त तडाखा दिला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये छापेमारी करून अमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त करतानाच 15 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तब्बल 327 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून तीन पिस्टल, रिव्हॉल्व्हरसह 33 जिवंत काडतुसेदेखील हस्तगत केली आहेत. त्यामुळे भाईंदर पोलिसांच्या या छापेमारीने दाऊद इब्राहिमचे हिंदुस्थानातील रॅकेट खिळखिळे झाले आहे. दरम्यान हे सर्व रॅकेट चालवणारा व रेड कॉर्नर नोटीस बजावलेला सलीम डोळा तसेच अन्य मुख्य पाच सूत्रधारांचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच 15 मे रोजी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात खणखणलेल्या पह्नवरून दाऊद इब्राहिमच्या अमली पदार्थांच्या अड्डय़ांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घेतली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश पुराडे यांच्या पथकाने मीरा-भाईंदरमध्ये मॅफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांवर झडप घातली. शोएब मेमन (रा. वसई) व निकोलस टायटस यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त करून काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शोएब मेमन व निकोलस टायटस या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोळा याच्या हिंदुस्थानातील ड्रग्ज रॅकेटची कुंडलीच पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद गाठून दयानंद ऊर्फ दया मुद्दनार व नासीर ऊर्फ बाबा शेख यांना ताब्यात घेतले. विकाराबाद जिह्यातील नरसापूर येथील त्याची फॅक्टरी पोलिसांनी उद्ध्वस्त करत 25 कोटींचा माल जप्त केला.

…आणि रॅकेटचा उलगडा होत गेला

नरसापुरातील फॅक्टरी उद्ध्वस्त केल्यानंतर अधिक चौकशीत दाऊदच्या हस्तकांच्या रॅकेटचा हळूहळू उलगडा होत गेला. पोलिसांनी वेळ न दवडता अधिकचा फौजफाटा घेऊन उत्तर प्रदेशमध्ये धाड टाकली. तेथे वाराणसीतून घनश्याम सरोज याला ताब्यात घेतले. मोहम्मद शकील मोईन याला मुंबईच्या गोरेगावमधून बेडय़ा ठोकल्या. तसेच दयानंद दया याने दिलेल्या माहितीवरून वासिंदच्या गणेशपुरी येथून भरत ऊर्फ बाबू जाधव याला अटक केली. त्याच्या पडघ्यातील लाप बुद्रुक येथील घरातून एमडी बनवण्यासाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले.

नशेची फॅक्टरी चालवण्यासाठी गुजरातमधून रसद

दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला सलीम डोळा हा मुंबईत राहून सर्व कारभारावर लक्ष ठेवतो. विशेष म्हणजे ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे पैसे तसेच तस्करीतून आलेला पैसा याची विल्हेवाट कशी लावायची याची सर्व ऑपरेटिंग गुजरातमधून सुरू होती. लागणाऱया पैशांची रसददेखील सुरतमध्ये राहणारा झुल्फिकार ऊर्फ मुर्तझा कोठारी हा पुरवत होता. त्याच्याकडून लाखो रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील बहुतांश व्यवहार हवालामार्फत होत असल्याचे तपासात समोर आल्याने भेंडीबाजारातील मुस्तफा फर्निचरवाला व हुसेन फर्निचरवाला यांच्यावर धाड टापून जवळपास पावणेसात लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. आजमगड येथून आमीर खान व त्याचा भाऊ बाबू खान यांना साथीदारांसह अटक केली असून 300 कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.