पुणे येथील कात्रज-काोेंढवा रस्त्यावरील कात्रज चौक ते राजस सोसायटी चौक या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास भूसंपादनाअभावी विलंब झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर व भीमराव तापकीर यांनी प्रश्नोत्तरांच्या तासांच्या वेळेत या पुलाचा प्रश्न उपस्थित केला होता.
उड्डाणपुलाचे काम रखडले आहे तर दुसरीकडे महापालिकेकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे स्थंलातर करण्याचे कामही संथगतीने सुरू आहे. त्याच वेळी कात्रज चौक हा अत्यंत वर्दळीचा असून केवळ सकाळच्या वेळेत येथे वाहतूक नियमनासाठी वार्डन असतात. वाहन चालकांना येथे नाहक त्रास होत असून या चौकात दिवसभर वार्डन नियुक्त करावेत. तसेच दिलेल्या मुदतीत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार, असे प्रश्न तापकीर यांनी उपस्थित केले होते.
या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, या उड्डाणपुलाचे काम आजमितीला 40 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच ‘स्लिप’ रस्त्याचे काम पूर्ण तर सेवा रस्त्याचे काम 95 टक्के र्प्णू झाले आहे. विद्युत वाहिन्या, कल्व्हर्ट रुंदीकरण तसेच मलनिस्सारण वाहिन्यांच्या स्थलांतराचे काम प्रलंबित आहे. हे काम तातडीने करण्यासाठी पुणे महापालिकेसह संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात येतील. याशिवाय कात्रज चौकात जर केवळ सकाळच्या सत्रातच वाहतूक नियमनासाठी वार्डन नियुक्त असतील तर याबाबत पुणे पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पूर्णवेळ वार्डन नियुक्त करण्यासाठी आदेश देण्यात येतील, असे चव्हाण यांनी सांगितले.
जानेवारी 2025पर्यंत पूर्ण
या उड्डाणपुलाच्या कामास भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा होता. येथील भूसंपादनास 2019ला सुरुवात झाली आणि आजपर्यंत ते प्रयत्न सुरू आहेत. पुणे महापालिकेने हे भूसंपादन पूर्ण करून ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने या भूसंपादनासाठी 139 कोटी रुपये नुकतेच महापालिकेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या पुलाचे काम जानेवारी 2025पर्यंत पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. राज्य सरकारने या भूसंपादनासाठी 139 कोटी रुपयांचा निधी दिला असून हे काम जानेवारी 2025पर्यंत पूर्ण होईल.