समृद्धीवरील दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबीय एक वर्षानंतरही मदतीपासून वंचित, तातडीने मदत देण्याची विरोधकांची मागणी

समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी बुलढाणा जिह्यातील सिंदखेड राजा येथे बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु सरकारने त्याचे पालन न केल्याने त्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर उपोषण सुरू केले आहे. सरकारने त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता. समृद्धीवर झालेल्या त्या भीषण अपघाताला आज एक वर्ष पूर्ण झाले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, परंतु सरकारकडून 5 लाख रुपये आणि पेंद्राकडून 2 लाख असे फक्त सात लाख रुपये त्यांच्या नातेवाईकांना मिळाले. एका मृताचे नातेवाईक असलेले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडावी यांनी सरकारने आश्वासनपूर्ती करावी या मागणीसाठी गळफास लावून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यावर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली, असे वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले.

पोर्शे कार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत सरकारने दिली. ती मिळायलाच हवी होती, पण समृद्धीवरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनाही न्याय मिळाला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. एका उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात उपस्थित आहेत. मदत द्यायची तर लवकर द्या नाहीतर तसे स्पष्ट करा अशी मृतांच्या नातेवाईकांची मागणी असल्याचे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख म्हणाले, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.