आरेतील आदिवासी पाडे, झोपडय़ांचे सर्वेक्षण, पुनर्वसन तब्बल 16 वर्षांनंतरही अपूर्ण, दुग्धविकासमंत्र्यांची माहिती 

मुंबईतील आरे वसाहतीमध्ये असलेले आदिवासी पाडे आणि झोपडय़ांचे सर्वेक्षण 2008 पासून सुरू करण्यात आले होते, मात्र तब्बल 16 वर्षांनंतरही हे सर्वेक्षण अपूर्ण आहे. त्यामुळे त्यातील कुटुंबांचेही अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नसल्याची माहिती दुग्धविकासमंत्र्यांनी लेखी उत्तरात प्रश्नोतरावेळी दिली.

आरेतील आदिवासी पाडे, झोपडय़ा यांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन गेली अनेक वर्षे प्रलंबित असून या भागातील झोपडय़ांची संख्याही दुप्पट झाली आहे. त्यावर सरकारने काय कार्यवाही केली, याबाबत भाई गिरकर यांनी प्रश्न विचारला होता. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीने दिलेल्या मंजुरीनुसार आरेतील आदिवासी पाडे आणि झोपडीधारकांना शौचालय, गटारे यासह लादीकरण, पायवाटा, समाजमंदिर शेड आदी मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या असल्याची माहिती दुग्धविकासमंत्र्यांनी दिली.