अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील विधानावरून विधान परिषदेत गोंधळ घालणाऱयांना रोखणाऱया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाविरोधात शिवसेनेचे अनिल परब यांनी आज उपसभापतींना निवेदन केले. दरम्यान, यासंदर्भात उपसभापतींच्या दालनात मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही दिलगिरीचे पत्र दिले आहे. त्यामुळे निलंबनाबाबत उद्या संसदीय कार्यमंत्री सभागृहात निर्णय सांगतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सामंजस्यपणे फेरविचार करावा!

प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब यांनी निलंबन मागे घेण्यासाठी निवेदन केले. बहुमताने घेतलेल्या निर्णयाने विरोधकांच्या अधिकारावर घाला घातला आहे. विरोधी पक्ष पद रिक्त असल्याने काम करण्याची इच्छा नाही. निलंबनाच्या कारवाईवर सामंजस्यपणे फेरविचार करावा, अशी भूमिका अनिल परब मांडली.

विरोधकांचा ठिय्या   

विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन मागे घ्या. यावर विचार करण्यासाठी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करा आणि निर्णय घ्या. तोपर्यंत आम्ही सर्व सभागृहात खाली बसून कामकाजात भाग घेऊ, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली आणि ते सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपसभापतींसमोरच वेलमध्ये ठिय्या केला. सचिन अहिर, विलास पोतनीस, सतेज पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोड, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांनी वेलमध्ये ठिय्या केला.

वंजारीदरेकर यांच्यात खडाजंगी

अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेस सदस्य अभिजित वंजारी यांनी भाषणातून मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्याविषयी असंसदीय शब्द वापरला, अशी तक्रार भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींकडे केली. दरेकर आणि वंजारी यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली. यावेळी अनिल परब यांनी मध्यस्थी करत दोन्ही सदस्यांची भाषणे तपासावीत आणि वंजारी यांच्या भाषणात काही असंसदीय शब्द असल्यास कामकाजातून वगळावे, अशी विनंती केली. उपसभापतींनी ती मान्य केली.