राज्याच्या अर्थसंकल्पात ज्या पद्धतीने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आणि कृषिपंपांना मोफत विजेची घोषणा केली त्याच धर्तीवर राज्याच्या नागरी भागातील अल्प उत्पन्न गटातील वीज ग्राहकांना तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफी देण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी राज्याचा अर्थसंकल्प म्हणेज मृगजळ असल्याची टीका केली. यावेळी त्यांनी राज्यावरील कर्जाची आकडेवारी मांडली. हा तुटीचा अर्थसंकल्प आहे आणि सरकार निधी कसा उभा करणार हा आमच्यासमोर प्रश्न आहे. बजेटपूर्वी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आला. त्यात तिजोरीत खडखडाट आणि घोषणांचा गडगडाट अशी परिस्थिती आहे. हे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. 2024-25 मध्ये कर्जाचा बोजा वाढून 7 हजार कोटी 82 लाख 991 कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर येईल. त्यामुळे कर्ज असताना आगामी निवडणूक डोळय़ासमोर अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या योजनांचा पाऊस पाडला. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी झाली तर राज्यातील जनतेला फायदा होईल. ‘लाडकी बहीण’ योजनेतील रक्कम दीड हजार रुपयांवरून पाच हजार रुपये करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.