साप वनखात्याच्या अखत्यारित येत नाही, वनमंत्री मुनगंटीवारांच्या उत्तराने विधानसभा अवाक्

बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये तसेच शेतांमध्ये घुसू लागल्याने प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. सर्पदंश झालेल्यांना सरकारकडून मदत मिळाली पाहिजे असे मत आमदारांनी मांडले. त्यावर साप आपल्या वनखात्याच्या अखत्यारित येत नाही, असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले. का बरं?… असे आमदारांनी विचारताच, साप वनात गेल्यावर चावत नाही, घरात चावतो म्हणून तो वनखात्याच्या अखत्यारित येत नाही, असे मुनगंटीवार म्हणताच हशा पिकला.

आमदार रणजीत सावरकर यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी चर्चेत भाग घेताना अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये बिबटय़ांची संख्या वाढली असून त्यांच्या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. वनखात्याने 25 बिबटे पकडले. त्यातील 10 बिबटे अंबानींच्या जामनगर येथील झूमध्ये कधी स्थलांतर करणार? त्यांची नसबंदी कधी करणार? असे बेनके यांनी विचारले. सर्पदंश झाला तर उपचारासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च होतो. सरकारने त्यासाठी प्रयोजन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विश्वजीत कदम यांनी पुरानंतर सांगलीत विषारी घोणस सापांचाही सुळसुळाट झाल्याचे सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना, सर्पदंश वन विभागाच्या क्षेत्राशी संबंधित नाही. सर्पदंशाला आता उपचारासाठी 2 लाख अनुदान दिले जाते, अशी माहिती दिली. बिबटय़ांची संख्या 1600 पेक्षा जास्त असून ती रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव ठेवला गेला होता, परंतु त्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.