दहा वर्षांत सहा हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. दुरुस्तीच्या कामावरही 192 कोटी रुपये खर्च केले गेले. भविष्यात त्यावर आणखी खर्च वाढण्याची शक्यता आहे. याची जाहीर कबुली राज्य शासनाने आज विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली. एक दशकाहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे केवळ 67 टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावर सन 2010 पासून अडीच हजारपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचे श्वेतपत्रिका काढून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत देण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली होती.
सरकारने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पनवेल ते इंदापूर हा पट्टा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. बीओटी तत्त्वावर त्याचे काम दिले होते. ते पूर्ण करू न शकल्यामुळे 2021 मध्ये तो करार संपुष्टात आणण्यात आला. नंतर नवीन पंत्राटदार नेमून काम हाती घेण्यात आले. त्या कामावर आजपर्यंत 231.63 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पनवेल ते इंदापूर या पट्टय़ातील 83 टक्के काम पूर्ण झाले आहे. इंदापूर ते झाराप या लांबीसाठी 6100.44 कोटी मंजूर रकमेपैकी 3580.33 कोटी रुपये खर्च करण्यात आला. देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पंत्राटदाराची असल्याने सरकारने त्यावर कोणताही खर्च केलेला नाही, असेही सरकारने उत्तरात नमूद केले आहे. इंदापूर ते झारापदरम्यानचे 85 टक्के काम पूर्ण झाल्याचीही माहिती सरकारने दिली आहे.
2012 पासून 1879 जणांचा अपघातात मृत्यू
2012 पासून मुंबई–गोवा महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये 1879 जणांचा मृत्यू झाला. पनवेल ते इंदापूर पट्टय़ात 344, तर इंदापूर ते झाराप पट्टय़ात 1532 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली.