
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत तीन आठवडय़ांसाठी वाढवण्यास आमची काहीच हरकत नाही. त्यांची टाटा रुग्णालयात रीतसर वैद्यकीय चाचणी केली जावी, असे ईडीने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
दोन महिन्यांसाठी मंजूर झालेल्या अंतरिम जामिनाची मुदत वाढवावी, अशी मागणी करणारा अर्ज गोयल यांनी दाखल केला आहे. न्या. एन. जे. जमादार यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. त्यात ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी वरील माहिती दिली. गोयल टाटा रुग्णालयात जाण्यास तयार नाहीत. उपचाराशी निगडित त्यांची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे वरिष्ठ वकील आबाद पौंडा यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने अॅड. पौंडा यांना दिले. यावरील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
538.62 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी गेल्या वर्षी ईडीने गोयल यांना अटक केली. पत्नीला कर्करोग आहे. अंतिम क्षणात तिच्यासोबत राहायचे आहे. त्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका गोयल यांनी दाखल केला.न्यायालयाने गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मे 2024 मध्ये मंजूर केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले. गोयल यांचीही कर्करोगाशी झुंज सुरू आहे.