
ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने आपण ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीत मग्न असल्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी झालो नाही, असे स्पष्टीकरण देत इतर चर्चांना पूर्णविराम दिला. नीरजने पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतल्याचे वृत्त काही मीडियातून आले होते, मात्र ही स्पर्धा आपल्या पॅलेंडरमध्ये नव्हतीच, असे नीरजने ‘एक्स’वरील सोशल अकाऊंटवर पोस्ट करून ही माहिती दिली. त्याने लिहिले की, ‘या हंगामातील माझ्या स्पर्धांमध्ये पॅरिस डायमंड लीगचा समावेश नव्हता. त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या मी केवळ मिशन ऑलिम्पिक हेच लक्ष्य डोळय़ासमोर ठेवले आहे. चाहत्यांचे आभार आणि डायमंड लीगमधील सहभागी खेळाडूंना माझ्या शुभेच्छा.’