हाथरसमधील सत्संगात चेंगराचेंगरी होऊन जे 121 जण मरण पावले, ते सर्व अंधश्रद्धेचे बळी आहेत. श्रद्धेपेक्षा हल्ली अंधश्रद्धेचीच चलती आहे व त्यामुळेच ही दुर्घटना घडली. आजकाल कोणालाही आपल्यात ईश्वरी अंश असल्याचा व आपणच परमात्मा असल्याचा साक्षात्कार होतो व त्यातूनच देशात भोंदूबाबांचे पेव फुटले आहे. तुरुंगातून सुटलेला एक लैंगिक शोषणाचा आरोपी स्वयंघोषित भोलेबाबा म्हणून मिरवतो आणि त्याच्या सत्संगात जाऊन लोक किड्या-मुंग्यांप्रमाणे तडफडून मरत असतील तर ते सामाजिक अधःपतनच आहे. हाथरस दुर्घटनेची चौकशी करण्यापेक्षा वाढत्या भोंदूगिरीपासून देशाला कसे वाचवता येईल, याचा कोणी विचार करणार आहे काय?
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मंगळवारी जे मृत्यूचे तांडव झाले ते भयंकर आहे. विज्ञानयुगात सारे जग तंत्रज्ञान व प्रगतीच्या शिखराकडे झेपावत असताना आपण मात्र अजूनही पाषाणयुगातील बुरसटलेल्या डबक्यातच डुबक्या मारण्यात धन्यता मानायची काय? हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेने हा प्रश्न नक्कीच उपस्थित केला आहे. कोण कुठला भंपक बाबा सत्संगाच्या नावाखाली आपल्या हजारो भक्तांची गर्दी जमवतो. सत्संगानंतर त्या भोंदूबाबाची पायधूळ मस्तकी लावण्यासाठी पळापळ होऊन चेंगराचेंगरी होते. एकमेकांना तुडवत, चिरडत हजारो लोकांचा जमाव धावत सुटतो. या चेंगराचेंगरीत घसरून पडलेले लोक चिखलात तुडवले जाऊन व गुदमरून मरण पावतात. अनेकांचा एका खड्ड्यातील दलदलीच्या डबक्यात पडून करुण अंत होतो. ही सगळीच घटना जेवढी मन व मेंदू बधिर करणारी आहे तेवढीच संतापजनकही आहे. या दुर्घटनेत 121 जण मृत्युमुखी पडले आहेत व अजूनही अनेक जखमी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मृतांमध्ये 108 महिला व 12 लहान मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेला सत्संगाचे आयोजक व भोंदूबाबाप्रमाणेच उत्तर प्रदेश सरकारही तेवढेच जबाबदार आहे. सरकारने सत्संगाला परवानगी दिली; पण गर्दीचे नियंत्रण, पार्किंगची व्यवस्था, पुरेसा बंदोबस्त याविषयी प्रशासन गाफील राहिले. केवळ वेळेवर पाणी व प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे अनेक जण प्राणाला मुकले. जखमींना घेऊन जाण्यासाठी अॅम्बुलन्स नव्हत्या. टेम्पोंमध्ये जखमी व रुग्णांना एकावर एक ठेवून रुग्णालयात पाठवले गेले. मृतदेहांचा हा खच पाहून एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयात जखमींचा व मृतांच्या नातेवाईकांचा जिवाचा
थरकाप उडवणारा
आक्रोश सुरू होता. लोक उपचारांची भीक मागत होते, पण रुग्णालयात डॉक्टर्सच नव्हते. डॉक्टर आले तर औषधे उपलब्ध नव्हती. हाथरसमध्ये हे सगळे मृत्यूचे तांडव सुरू असताना पंतप्रधान मोदी संसदेत ‘विकसित भारत’ व ‘अमृत काल’ यावर भाषण देत होते. संसदेत मांडले जाणारे विकासाचे चित्र आणि हाथरसमधील वास्तव यामध्ये जमीन-आस्मानचे अंतर आहे. पण त्यासाठी अंधश्रद्धा सोडून डोळसपणे पाहण्याची दृष्टी सरकारकडे असली पाहिजे. हाथरसच्या फुलराई गावात मंगळवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली त्या वेळी हा भेंदूबाबा गावातच होता. मात्र बचावकार्याचे प्रयत्न करण्याऐवजी मोबाईल बंद करून तो सत्संगाच्या ठिकाणावरून फरार झाला. संकटसमयी किडे-मुंग्यादेखील एकमेकांच्या मदतीला धावून जातात, मात्र भोलेबाबाच्या सत्संगात उलटेच घडले. बाबाचे भक्त असलेली माणसे एकमेकांच्या पायाखाली चिरडून मरत असताना हा भोंदूबाबाच भक्तांना संकटात सोडून पाय लावून पळून गेला. अशा माणसाला संत म्हणायचे तरी कसे? मरण पावलेल्या भक्तांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत नाही, जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाण्याचे सौजन्य दाखवत नाही, तो कसला आलाय संत-महात्मा? सनातन हिंदू धर्म व त्याचा संस्कार तर सोडाच; पण साधी माणुसकी व मानवता धर्मही ज्याला ठाऊक नाही अशा माणसाला सत्संग घेण्याचा अधिकार तरी आहे काय? सूरज पाल हे या बाबाचे मूळ नाव. उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात नोकरी करत असताना लैंगिक शोषण व छळाचे 5 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. अटकेनंतर त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला आपल्यात ईश्वरी अंश असल्याचा
साक्षात्कार
झाला व त्याने आपले नाव बदलून नारायण हरी ऊर्फ साकार विश्वहरी ठेवले. इतर बाबा लोकांप्रमाणे भगवे कपडे वगैरे न घालता तो सुटा-बुटातील धर्मोपदेशक बनला. पांढऱ्या रंगाचे महागडे कोट, पांढरेच बूट, महागड्या गाड्या, महागडे गॉगल्स याचा शौकीन असलेला सूरज ऊर्फ नारायण हरी आग्रा व आसपासच्या भागात सत्संग देत फिरू लागला. पाहता पाहता उत्तर प्रदेशपासून राजस्थान, हरियाणापर्यंत त्याची कीर्ती व भक्त संप्रदाय पसरला. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये या बाबाचा तब्बल 30 एकरांचा आश्रम आहे. आश्रमात देवाची एकही मूर्ती नाही. या बाबालाच भगवान शिव समजून भाबडे लोक त्याची पूजा करतात. त्यामुळे त्याचे नाव भोलेबाबा असे पडले. कुठलाही आगा-पिछा माहिती करून न घेता लोक तरी अशा ढोंगी व भोंदूबाबांच्या मागे कसे लागतात, हेदेखील आश्चर्यच आहे. शिवाय अशा लुटारू बाबांच्या अंधश्रद्धाळू फौजा यादेखील शेवटी व्होट बँकाच असतात. त्यामुळे राजकीय पक्ष व सरकारे यांचेही अशा तोतया बाबांना संरक्षण मिळते, हे देशाचे व धर्माचेही दुर्दैवच म्हणायला हवे. हाथरसमधील सत्संगात चेंगराचेंगरी होऊन जे 121 जण मरण पावले, ते सर्व अंधश्रद्धेsचे बळी आहेत. श्रद्धेपेक्षा हल्ली अंधश्रद्धेचीच चलती आहे व त्यामुळेच ही दुर्घटना घडली. आजकाल कोणालाही आपल्यात ईश्वरी अंश असल्याचा व आपणच परमात्मा असल्याचा साक्षात्कार होतो व त्यातूनच देशात भोंदूबाबांचे पेव फुटले आहे. तुरुंगातून सुटलेला एक लैंगिक शोषणाचा आरोपी स्वयंघोषित भोलेबाबा म्हणून मिरवतो आणि त्याच्या सत्संगात जाऊन लोक किडय़ा-मुंग्यांप्रमाणे तडफडून मरत असतील तर ते सामाजिक अधःपतनच आहे. हाथरस दुर्घटनेची चौकशी करण्यापेक्षा वाढत्या भोंदूगिरीपासून देशाला कसे वाचवता येईल, याचा कोणी विचार करणार आहे काय?