चॅपिंयन्स ट्रॉफीच्या निमीत्ताने हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान ही लढत चाहत्यांना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. 1 मार्च 2025 रोजी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने IND Vs PAK सामना लाहोरमध्ये खेळवण्याचे नियोजन केले आहे. परंतु BCCI ने यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी 1 मार्च रोजी लाहोरमध्ये आपापसात भिडणार आहेत. परंतु टीम इंडिया पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार का नाही, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी T20 World Cup 2024 च्या अंतिम सामन्या दरम्यान आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 15 सामन्यांचे वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार सात सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराची आणि पाच सामने रावळपिंडीमध्ये खेळवले जाणार आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
दोन ग्रुपमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. ग्रुप एमध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, न्युझीलंड आणि बांग्लादेश यांचा समावेश आहे, तर ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. 9 मार्च रोजी अंतिम सामना लाहोरमध्ये पार पडणार आहे. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.