राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा आजपासून डोंबिवलीत; सिद्धेश पांडे, श्रुती अमृते यांना अग्रमानांकन

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या सहकार्याने डोंबिवली येथे बुधवार, 3 जुलैपासून यंदाची पहिली राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेतील पुरुष व महिला गटाकरिता अनुक्रमे सिद्धेश पांडे व श्रुती अमृते या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

ही स्पर्धा सावळाराम क्रीडा संपुलातील सुरेंद्र बाजपेयी स्मृती इनडोअर सभागृहात 3 ते 7 जुलै या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, परभणी, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आदी जिह्यांतील अनेक नामवंत खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी पुरुष गटात ठाण्याचा सिद्धेश पांडे, तर महिला गटात मुंबई जिल्हा उपनगरची श्रुती अमृते यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन कल्याण येथील कल्याण महिला मंडळाने केले आहे. यंदाच्या मोसमातील ही पहिलीच राज्य मानांकन स्पर्धा असल्यामुळे त्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.