अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट होऊनही तब्बल 73 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. पहिल्या यादीत 1 लाख 30 हजार 650 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले होते, मात्र यापैकी केवळ 57 हजार 450 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीत 55 हजार 655 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले. यापैकी 41 हजार 701 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून प्रवेस न घेतलेल्या 13 हजार 954 विद्यार्थ्यांना 10 जुलै रोजी जाहीर होणाऱया दुसऱया गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार 241 मिळालेला प्रवेश नाकारला आहे, तर 216 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला असून 72 हजार 743 विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी कॉलेजपर्यंत गेलेले नाहीत.
आतापर्यंत झालेले प्रवेश
कोटा उपलब्ध प्रवेश जागा घेतले
ऑनलाइन 2,29,003 57,450
इनहाऊस 26,225 5442
अल्पसंख्याक 1,07,015 13,034
व्यवस्थापन 18,593 651
एकूण 3,80,836 76,577
6 जुलैपर्यंत प्रवेशअर्ज भरता येणार
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना उद्या, 3 जुलै ते 6 जुलै या कालावधीत आपल्या प्रवेश अर्जाचा भाग–1 व भाग-2 मध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात बदल करायचा असल्यास बदल करून आपले अर्ज लॉक करून ठेवावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना कोटय़ातून प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी केंद्रीय कोटय़ाचा व संबंधित राखीव कोटय़ाच्या ऑप्शनवर क्लिक करून प्रवेश अर्ज 6 जुलैपूर्वी लॉक करावा. 6 जुलैपूर्वी प्रवेश अर्जाचा भाग-1 व 2 लॉक केलेल्या विद्यार्थ्यांचाच दुसऱया गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार आहे.