राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच दमछाक झाली. पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी मणिपूर… मणिपूर… मणिपूर… म्हणत पंतप्रधान मोदींना घेरले. विरोधी पक्षांची घोषणाबाजीमुळे पंतप्रधान मोदींवर कानाला हेडफोन लावून बोलण्याची वेळ आली. गो… गो… मणिपूर…, मणिपूर… मणिपूर…, जस्टिस फॉर मणिपूर… वुई वॉन्ट जस्टीस… वुई वॉन्ट जस्टीस…, जुमलेबाजी नही चलेगी… नही चलेगी… नही चलेगी… अशा घोषणांनी विरोधी पक्षांनी लोकसभा दणाणून सोडली.
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाने भाजपचे संसदेत बळ वाढले होते. पण 2024 च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने बहुमत गमवले आणि एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या टेकूवर सत्ता स्थापन केली. दुसरीकडे विरोधी पक्षांचे खासदार वाढल्याने संसदेत विरोधकांचे मनोधैर्य वाढले आहे. गेल्या 10 वर्षात एककल्ली कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला आता विरोधकांच्या तीव्र रोषाच्या सामना करावा लागत आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सोमवरी जोरदार भाषण झाले. राहुल गांधी यांनी हिंदुत्व, अग्निवीर, नीट पेफरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या भाषणाने अस्वस्थ झालेले पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन-दोन वेळा उठून बोलण्याची वेळ आली.
मोदींचे अडखळत अडखळत भाषण
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी बोलावं अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. मणिपूर… मणिपूर.. म्हणत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू केली. पण पंतप्रधान मोदींनी कानाला हेडफोन लावत भाषण सुरूच ठेवले आणि विरोधकांच्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा आवाज आणि त्यांच्या घोषणाबाजीने भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी विचलित होत होते. भाषणादरम्यान ते अडखळत होते. आपला आवाज पोहोचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना आवाज वाढवावा लागला. आपला एकीकडे विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक होते. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील खासदारांचे चेहरे पडलेले दिसत होते.