हरयाणातील गुरुग्राम सेक्टर 107 मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 9 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. फ्लॅटमध्ये चोरी करताना एका छोट्या मुलीने पाहिले, म्हणून तिची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी एका हाउसिंग सोसायटीत घडली.
16 वर्षीय मुलाने 9 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जाळला. लहान मुलीने आरोपी मुलाला फ्लॅटमधून सोन्याच्या दागिन्याची चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. म्हणून आरोपीने टोकाचे पाऊल उचलले.
पीडित मुलगी ही चौथीच्या वर्गात शिकत होती आणि आरोपी इयत्ता 10 चा विद्यार्थी आहे. दोन चोर घरामध्ये घुसले होते. त्यांनी मुलीची हत्या केली, अशी माहिती आरोपीने दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने नंतर स्वतःच हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी मुलावर 20 हजार रुपयांचे कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली, असे आरोपीने सांगितले. आता पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. आणि पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलाने फ्लॅट क्रमांक 104 मध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. फ्लॅटमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून तो नुकताच बाहेर पडत असताना घरात असलेल्या लहान मुलीने वॉशरूममधून बाहेर येऊन आरोपीला पाहिले. त्यावेळी मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या मुलीचा गळा दाबून आरोपी मुलाने तिची हत्या केली. त्यानंतर अंगावर रॉकेल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.