विधान परिषदेत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी खडाजंगी उडाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांबाबत अपशब्द वापरले. या प्रकरणी मंगळवारी विधानपरिषेदत भाजपने अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला व सभापतींनी विरोधकांना कोणत्याही प्रकारच्या चर्चेची संधी न देता सभापतींनी दानवेंचे निलंबन केले. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांचे निलंबन हे षडयंत्र रचून केल्याचा आरोप करत हा निर्णय लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे जर माता बहिणींचा अपमान झाला असेल तर त्यासाठी मी त्यांची माफी मागतो असेही म्हटले आहे.
”अंबादास दानवे यांना निलंबीत करण्यात आले आहे. विधानभवनात जेव्हा एखादा प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्यावर चर्चा करणं व दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो. निलंबनाचा निर्णय सभापतींचा असतो पण एकतर्फी निर्णय हे लोकशाहीला घातक व मारक आहे. एका कुणाकडून मागणी झाली म्हणून निलंबन करणे हा लोकशाही विरोधी निर्णय आहे. अंबादास दानवेंनाही त्यांची बाजू मांडायची संधी द्यायला हवी होती. ती दिली नाही. आमच्याकडून कोणालाही बोलू दिलं नाही. जणूकाही एक षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबीत केलंय. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा झालंय. हा जो अन्याय आहे महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहतेय. आमचा कालचा विजय झाकळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला. यांच्या बोगस अर्थसंकल्पाची देखील चिरफाड व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ते जनतेपासून लपविण्यासाठी अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आलेय’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”काल विधान परिषदेत राहुल गांधींविरोधात जो ठराव आणत होते तोच चुकीचा होता. त्या ठरावाचा संबंधच काय असा प्रश्न दानवे यांनी केला होता. मी स्वत: राहुल गांधींचं ते भाषण ऐकलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आमच्या पैकी कुणीही हिंदु्चा अपमान करणं शक्य नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे राहुलजींच्या निषेधाचा ठराव आणला. राहुल गांधींनी भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे ठणकावून सांगितले. त्यासाठी जर तुम्ही ठरवा मंजूर करून घेतला असता. तर असत्य माहितीच्या आधारे ठराव मांडणं हा देखील सभागृहाचा अपमान आहे. मग त्या सदस्याला देखील निलंबीत करणार आहात का? जर तसं होणार असेल तर माझी दोन्ही सभागृहांना विनंती राहिल की लोकसभेत जय संविधान बोलल्यावर ज्यांना मिरच्या झोंबल्या त्यांच्या निषेधाचा ठराव देखील मांडावा व तो ठराव मंजूर करून तो लोकसभेत पाठवावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”अंबादास दानवे यांच्या वक्तव्याने जर माता भगिणींचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो. पण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोदींच्या सभेत भाऊ बहिणींच्या नात्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंलं त्यासाठी त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. यांचे मंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोर शिवी दिलेली. त्यांच्यावरही कारवाई व्हायला ही. हा माता भगिणींचा अपमान नाही का? महिलेवर अत्याचार केले म्हणून ज्याला आम्ही मंत्रीमंडळातून काढले होते त्याला तुम्ही मंत्रीमंडळात जागा देताय हा महिलांचा अपमान नाही. सभागृहात केला तर अपमान आणि जाहीर केला तर अपमान नाही असं आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.