सत्य कधीच कुठूनही काढून टाकता येत नाही! एका वाक्यात राहुल गांधींचा भाजपवर पलटवार

राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत हिंदुत्व, भगवान शिव, अभय मुद्रा, इस्लाम आणि अग्निवीर यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप चांगलाच हडबडला. यानंतर हिंदूंच्या अवमानाचा बोगस आक्षेप घेत मुद्दे भरकटवण्याचा जोरदार प्रयत्न करीत सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः गोंधळ घातला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने लोकसभा अध्यक्षांनी या भाषणातील काही मुद्दे हटवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

त्यावर बोलताना राहुल गांधी यांनी सत्य कधीच कुठूनही काढून टाकता येत नाही, असा पलटवार केला. ”मोदींच्या दुनियेत सत्य काढून टाकले जाऊ शकते. मात्र प्रत्यक्षात सत्य कधीच काढून टाकले जाऊ शकत नाही. मला जे बोलायचे ते मी बोलले. ते सत्य आहे. सत्य कधीच काढून टाकता येत नाही”, असे राहुल गांधी म्हणाले.

सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत र्चेला सुरुवात झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर हल्ला चढवला. आम्ही संविधानावर होत असलेल्या हल्ल्यावर बोलल्यानंतर भाजपकडून आता वारंवार भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र जे लोक फक्त दिखाऊपणासाठी सतत हिंदुत्वाचा उदोउदो करीत असतात त्यांच्याकडूनच हिंसा, नफरत, असत्य अशा गोष्टी केल्या जात असल्याचा आरोपही केला. राहुल गांधींनी  भाषणादरम्यान भगवान शंकराचा फोटो दाखवला. त्याकर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत नियमावली सांगितली. आम्ही सभागृहात शिवजींचे चित्रही दाखवू शकत नाही, तुम्ही मला थांबवत आहात, असे राहुल म्हणाले. माझ्याकडे आणखी चित्रे होती जी मला दाखवायची होती. यावेळी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात एकच गोंधळ घालत राहुल गांधी यांनी समस्त हिंदूचा अवमान केल्याचा आरोप करीत माफी मागण्याची मागणी केली.

संघाची विचारधारा देशासाठी धोकादायक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. या संघटनेने विद्यापीठे आणि एनसीईआरटीसह शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या सदस्यांची कुलगुरू आणि प्राध्यापकपदी नियुक्ती करून घुसखोरी केली आहे, असा जोरदार हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे. आमच्या सर्व संस्थांवर एका संघटनेने ताबा मिळवला आहे. आरएसएस आणि भाजपने मिळून देशातील संस्थात्मक रचनाच नष्ट केली आहे, असे ते म्हणाले.