
यवतमाळ जिल्ह्यात बुलेट गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांवर आता यवतमाळ वाहतूक विभागातील पोलिसांची करडी नजर असणार आहे. शहरातील विविध परिसरात आता हौशी बुलेट चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यवतमाळात 21 “बुलेट राजांवर” पोलिसांनी कारवाई केली आहे. जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांच्यावतीने यवतमाळ शहरांमध्ये दोन ठिकाणी मोटार व्हेहीकल ऍक्ट केसेस मोहीम राबवून शहरात मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून चालवणारे 21 बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान बुलेट धारकांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले व त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई करताना इतर 251 वाहनधारक इतर मोटार वाहन केसेस करून 1,79,000 दंड आकारण्यात आला आहे.
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठा आवाज करणाऱ्या सायलेंसरवर आणि दादा, भाई, लव्ह असे शब्द लिहून दुचाकी चालवीत असलेल्या चालकावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बुलेट चालवून शहरात हवा करणं महागात पडणार आहे. त्यामुळे ज्यांच्या गाडीला अशा प्रकराचे आवाज करणारे सायलेंसर असतील तर त्यांनी साधे सायलेंसर बसवून घ्यावेत, असं आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अजित राठोड यांनी केले आहे. बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील कायम आ वासून उभा असतो. त्यामुळे कारवाई करत आहेत. आता हे सायलेन्सर नष्ट करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व दुचाकीधारकांना कंपनीने दिलेले सायलेन्सरच वापरावे. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरू नये, कर्ण कर्कश हॉर्न वापरू नये. तसेच वाहन चालवताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा व इतर वाहतुकीचे नियम पाळावे व आपण आपले कुटुंब सुरक्षित करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
ही कारवाई वाहतूक पोलीस निरीक्षक अजित राठोड, उप पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, साहेबराव राठोड, अंबादास कावरे, जगदीश राठोड, प्रदीप तांबेकर, राहुल मडावी निलेश आठवले व इतर स्टाफ हजर होता.