सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत जोरदार भाषण केलं. त्यांच्या या भाषणावरून लोकसभेसह देशभरात गदारोळ माजला. त्याबाबत विचारले असता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ”राहुल गांधी यांनी काल संसदेत केलेले भाषण हे देशाला दिशादर्शक व मार्गदर्शक होते. त्यांच्या भाषणाने भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला व मोदी शहांना गुडघ्यावर आणले”, असा घणाघात संजय राऊत यांनी केली.
” ज्यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात हिंदु धर्माचे सर्वात मोठे गुरू शंकराचार्याना आमंत्रित केले नाही. त्यांनी हिंदुत्वावर गप्पा माराव्यात? कालचे राहुल गांधी यांचं भाषण देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शत होतं. राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. काय खोटं बोलले ते? भाजप नेहमी उद्धव ठाकरेंवर आरोप करतं की त्यांनी हिंदुत्व सोडलं. तेव्हा उद्धव ठाकरे जे उत्तर देतात तेच राहुल गांधींनी दिलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी शहा मोदींच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही. हिंदुत्वाची व्याप्ती विचार खूप मोठा आहे. तो तुम्हाला समजलेला नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
”काल राहुल गांधींच्या भाषणावर नऊ मंत्री, एक गृहमंत्री, एक अकेला सबपर भारी असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांवर राहुल गांधी भारी पडले. राहुल गांभी भाषण करत असताना त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे प्रोटेक्शन मांगावं लागलं. कालचं चित्र फार विचलीत करणारं होतं. दहा वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागलं. कालपर्यंत आम्हाला यांच्यापासून संरक्षण मागावं लागत होतं. आता पर्यंत यांची दादागिरी होती. काल राहुल गांधींनी मोदी शहांना गुडघ्यावर आणलं. मजबूत विरोधी पक्ष व प्रामाणिक विरोधी पक्ष नेता काय असतो हे देशाने पाहिलं. ही फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या?, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.