राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर विधान परिषदेत गोंधळ घालणाऱया सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. जे लोक चार पक्ष फिरून नुकतेच भाजपमध्ये आले आहेत, ज्यांना भाजपमध्ये येऊन जुम्मा जुम्मा चारच दिवस झाले आहेत, ते लोक मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 खटले सुरू आहेत. मी चार वेळा तडीपारदेखील झालो आहे. अशा शिवसैनिकाला प्रसाद लाडसारख्या माणसाने हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. पक्षाचा प्रचार करून धंदा करणाऱया प्रसाद लाडसारख्या बाटग्याने मला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना लगावला.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विधान परिषदेच्या कामकाजाशी या विधानाचा काहीही संबंध नाही, असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सांगत असताना गोंधळ घालून सभागृहाला वेठीस धरण्याचे काम आज भाजपच्या आमदारांनी केले. यावेळी भाजप आमदाराने भर सभागृहात विरोधी पक्ष नेत्याविरुद्ध हातवारे आणि शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या दानवे यांनी शिवसैनिकाचा अवतार धारण करत आमदाराला त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
विधान परिषदेत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेले महाराष्ट्र राज्य काwशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लागलीच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधानाचा निषेध करण्याचा ठराव मला मांडायला परवानगी द्या, अशी मागणी केली. मात्र, आता राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, विशेष उल्लेख सूचना आणि विरोधी पक्ष नेत्यांचा 260 चा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयांवर आधी चर्चा करू या. तुम्ही खाली बसा, असे उपसभापतींनी लाड यांना सांगितले. मात्र, लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या इतर आमदारांनी आमच्याकडेही खूप महत्त्वाचे आहे, असे सांगत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे काम पुन्हा सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांचा निषेध करून राहुल गांधी यांनी हिंदू हिंसक आहे, बोलून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा मी निषेध करतो, असे दरेकर तावातावाने बोलू लागले. भाजप आमदारांनीही ’राहुल गांधी हाय हाय’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याच वेळी विरोधकांनीही ’नरेंद्र मोदी हाय हाय’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले आणि पुन्हा गोंधळ वाढला. त्यामुळे उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.
माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात
माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. सभागृहात माझा तोल सुटला नाही. मुळात जो विषय या सभागृहाशी संबंधित नव्हता त्यावर ते (प्रसाद लाड) माझ्याकडे बोट दाखवून, हातवारे करून बोलत होते. त्यांना काही बोलायचं होतं तर त्यांनी थेट सभापतींशी बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून बोलण्याला काही अर्थ नव्हता. एखाद्या सदस्याला बोलण्यापासून रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. राहिला प्रश्न आक्रमकतेचा, तर मी आमदार असणं, विरोधी पक्ष नेता असणं ही वेगळी गोष्ट, पण त्याआधी मी एक शिवसैनिक आहे आणि ती एका शिवसैनिकाची प्रतिक्रिया होती, असे दानवे म्हणाले.
राहुल गांधी यांना इटलीला पाठवा!
सभागृह पुन्हा सुरूच होताच प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करून तो लोकसभेला पाठवावा, अशी माझी मागणी आहे. नाही तर त्यांना इटलीला तरी पाठवून द्या, अशी मागणी केली.
संसदेतील विधानाचा इथे काय संबंध?
यावेळी विरोधी पक्ष नेत्यांना बोलू द्या, गोंधळ घालू नका, अशी तंबी उपसभापतींनी भाजप आमदारांना दिली. अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यानंतरही भाजप आमदारांचा गोंधळ सुरूच होता. दानवे बोलले, जे काही विधान राहुल गांधी यांनी केले आहे ते संसदेत केले आहे. त्याचा संबंध आपल्या सभागृहाशी येतो का, असा माझा प्रश्न आहे. भाजपने हिंदुत्वाबद्दल आम्हाला सांगू नये, असे सांगत असतानाच प्रसाद लाड हे दानवे यांच्याकडे हातवारे करून बोलू लागले. त्यामुळे चिडलेल्या दानवे यांनी माझ्याकडे हातवारे करून बोलू नका. मात्र, मी बोलणारच, बोलणारच असे लाड तावातावाने बोलत राहिले. त्यामुळे नाईलाजाने दानवे आसनावरून उठून पुढे आले आणि शिवी दिली. त्यामुळे प्रसाद लाड यांनीही शिवी दिली. त्यामुळे सभागृह गोंधळ आणि घोषणा-प्रतिघोषणांनी दणाणून गेले.
ठराव मांडता येणार नाही, स्यूओ मोटोही करता येणार नाही!
सभागृहात प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांचे हे वागणे योग्य नाही. सभागृहाची मर्यादा पाळावी. निषेध ठराव करण्यासाठी संसदीय कार्यमंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. त्यामुळे हा ठराव मंजूर करता येणार नाही. तुम्हाला या विषयावर सभागृहात बोलायचे असले तर गटनेते, संसदीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी लागेल. कोणताही ठराव स्यूओ मोटो करणार नाही, असे सांगत उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.