आजपासून देशभरात भारतीय न्याय संहिता-2023 हा नवा कायदा लागू झाला. या कायद्यान्वये शहरातल्या डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे.
गिरगाव चौपाटीवर भेळ प्लाझामध्ये आचारी काम करणाऱया दिलीप सुभेदार सिंह (34) याने दिलेल्या तक्रारीवरून डॉ. डी.बी. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319 (सी) सह कलम 66 (का) (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा रविवारी रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास दाखल केला. गिरगाव चौपाटीवरील भेळ प्लाझा येथे काम करणाऱया दिलीपला एका अज्ञात व्यक्तीने 26 तारखेपासून रविवारी रात्रीपर्यंत संपर्क साधून तो फिनसर्व्ह कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. मग कर्ज देण्याच्या बहाण्याने दिलीपला विलोभने दाखवली. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याचे सांगून वेगवेगळय़ा चार्जेसच्या बहाण्याने त्यांच्या खात्यातील 73,166 रुपये त्याला वेगवेगळय़ा बँक खात्यांवर पाठविण्यास भाग पाडले आणि पैसे घेऊन दिलीपची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच दिलीपने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार रात्री पावणेएक वाजता डॉ. डी.बी. मार्ग पोलिसांनी नवीन कायद्यानुसार फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल केला.