अतिधोकादायक इमारतीत 363 कुटुंबांचे वास्तव्य, म्हाडाच्या नोटिसीनंतरही घरे खाली करण्यास रहिवाशांचा विरोध

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने शहरातील 20 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर करत संबंधित रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस धाडली होती. मात्र, म्हाडाच्या नोटिसीनंतरही 363 कुटुंबांचे याच धोकादायक इमारतीमध्ये ठाण मांडून बसल्याचे समोर आले आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे दरवर्षी पावसाळय़ापूर्वी जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदाच्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात 20 इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये 494 निवासी व 217 अनिवासी असे एकूण 711 भाडेकरू आहेत. पावसाळय़ात इमारत कोसळून अपघात झाल्यास जीवित अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून म्हाडाने आतापर्यंत 66 कुटुंबीयांची संक्रमण शिबिरात राहण्याची व्यवस्था केली असून 16 कुटुंबियांनी स्वतःची व्यवस्था स्वतःच केली आहे.

सहा इमारतींमधील रहिवाशांचा विरोध

20 अतिधोकादायक इमारतींपैकी आतापर्यंत पाच इमारती पूर्णपणे रिक्त तर 9 इमारती अंशतः रिक्त झाल्या आहेत. आमची इमारत धोकादायक नसल्याचा दावा करत सहा इमारतींमधील कुटुंबांनी आपली घरे सोडण्यास नकार दिला आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.