भवन्स महाविद्यालयाचा ‘बॅफ’ अभ्यासक्रमच्या प्रवेशात प्रचंड गोंधळ

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालय प्रशासनाने ‘बॅफ’ (बीएएफ) अभ्यासक्रमासाठी केवळ 60 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर असताना तब्बल 120 जणांची निवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ 36 जणांनाच प्रवेश देण्यात आला. यानंतर थेट 220 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून ‘प्रथम येणाऱयास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश घेण्याची नोटीस जाहीर करण्यात आली. यामुळे ‘बॅफ’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱयांनी भवन्स कॉलेजवर जोरदार आंदोलन करीत प्रवेश प्रक्रिया सुरळीत राबवण्याची मागणी केली.

भवन्स कॉलेजच्या प्रवेशाच्या गोंधळामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच महाविद्यालयाला मिळालेल्या ऑटोनॉमस बीएसस्सी (एमएलटी) आणि बीएसस्सी (एमआयटी) हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केलेत, परंतु यात विद्यार्थ्यांच्या आरक्षणास हरताळ फासले आहेत. विद्यार्थ्यांचे आरक्षण नाकारणे म्हणजेच संविधानाची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे हतबल विद्यार्थ्यांची तक्रार युवासेनेकडे येताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार कुलगुरू मुंबई विद्यापीठ कलिना येथे रीतसर तक्रार दाखल करून विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी अर्ज दाखल करून कॉलेजवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर भवन समाज विद्यालय अंधेरी येथे जाऊन प्रिन्सिपल यांना भेटून प्रवेशाबाबत ताबडतोब निर्णय घेण्यासाठी निवेदन दिले.

24 तासांत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन

भवन्स कॉलेज प्रशासनाने 24 तासांत या विषयावर योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार घ्यावेत अन्यथा उग्र आंदोलन घेण्यात येईल अशी तंबी प्रशासनाला देण्यात आली आहे. यावेळी युवासेना माजी सिनेट सदस्य शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, विभाग संघटक परम यादव, मुंबई समन्वयक किसन सावंत, कॉलेज कक्ष पदाधिकारी निरीक्षक नमिता नाईक, ऋषिकेश साळवी, अंधेरी युवा विभाग अधिकारी रमेश वांजळे, युवासेने पदाधिकारी युवातीसेना पदाधिकारी उपस्थित होते.