आवाssज शिवसेनेचाच… कौल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच; अनिल परब आणि अभ्यंकर यांचे दणदणीत विजय

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेची मशाल धगधगली. मुंबई पदवीधर मतदारसंघात ऍड. अनिल परब यांचा 26012 इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ज.मो. अभ्यंकर विजयी झाले. अनिल परब यांना 44784 आणि भाजपचे किरण शेलार यांना 18772 मते मिळाली. शेलार यांच्यापेक्षा दुपटीहून अधिक मतांचा वर्षाव मतदारांनी परब यांच्यावर केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत तुफान जल्लोष केला. सलग सहाव्यांदा मुंबई पदवीधर मतदारसंघ जिंकून शिवसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखला. मुंबई शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेचे ज.मो. अभ्यंकर विजयी झाले. मुंबईतील मतदारांनी भाजपला पुन्हा एकदा नाकारल्याचे या निवडणुकीतून सिद्ध झाले.

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील जागांसाठी 26 जून रोजी मतदान झाले होते. आज नाशिक वगळता इतर तीन जागांसाठी नेरूळच्या कोळी-आगरी भवनात मतमोजणी झाली. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या जागेची मतमोजणी अंबड येथील वखार महामंडळाच्या गोदामात झाली.

अनिल परब हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्यांनी भाजपच्या किरण शेलार यांच्यापेक्षा कितीतरी पुढे मजल मारली होती. त्याच वेळी परब यांचा विजय निश्चित झाला होता. एकूण 67 हजार 644 मतदान झाले होते. त्यात 3 हजार 422 मते अवैध ठरली.

मुंबई पदवीधर मतदारसंघात आठ उमेदवारांपैकी खरी लढत अनिल परब आणि किरण शेलार यांच्यामध्येच झाली. अनिल परब यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे 18774, 18371 आणि 7639 इतकी मते मिळाली तर किरण शेलार यांना अनुक्रमे 7575, 7917 आणि 3280 मते मिळाली. शिवसैनिकांनी या मतदारसंघात नोंदवलेली तब्बल 12 हजार मते मतदान यादीतून बाद करूनही भाजपा आणि मिंधे गटाला शिवसेनेने पाणी पाजले. मुंबई शिक्षक मतदारसंघही शिवसेनेने जिंकला. शिवसेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष मोरे यांचा पराभव केला.

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूकित भाजपचे आमदार निरंजन डावखरे विजयी झाले.  डावखरे यांना एक लाख 719 मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना 28 हजार 585 मते मिळाले. या निवडणुकीत डावखरे यांचा 72 हजार 134 च्या मताधिक्यांनी विजय झाला.  नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

‘शिवसेना आमच्या साहेबांची,नाही कुणाच्या बापाची’

हा विजय मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष लढले. त्यांचा मी आभारी आहे. ‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ हे सिद्ध झाले आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा उद्धव ठाकरेंच्याच मागे उभा राहणार, अशी प्रतिक्रिया या विजयानंतर अनिल परब यांनी दिली.

कोकण पदवीधरमधून भाजपचे डावखरे विजयी

कोकण पदवीधरमधून  भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झाले.

नाशिकमध्ये काँटे की टक्कर

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे ऍड. संदीप गुळवे, मिंधे गटाचे किशोर दराडे, अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात काँटे की टक्कर रात्री उशिरापर्यंत सुरू होती.