अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी सात दिवसांत आर्किटेक्टची नियुक्ती; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

प्रातिनिधिक

काळाचौकीच्या अभ्युदय नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आर्किटेक्टची नियुक्ती करता आली नाही. पण पुढील सात दिवसांत आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत पुनर्विकासाचा पूर्ण प्रस्ताव तयार होईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी लक्षवेधीद्वारे अभ्युदय नगरच्या  प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, अभ्युदय नगरमध्ये 33 एकरच्या जागेवर 48 इमारतींमध्ये 3 हजार 410 सदनिका आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा या इमारतींची दुरुस्ती झाली आहे. इमारतींचा स्लॅब कोसळणे ही नित्याची बाब झाली आहे. सतत दुर्घटना घडत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून रहिवाशी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा म्हणजे मुद्रांक शुल्क आहे. मुद्रांक शुल्कामुळे अनेक विकासकांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याने अभ्युदय नगरचा पुनर्विकास रखडला आहे. म्हाडाकडून 33/5 अंतर्गत पुनर्विकासाचा प्रस्ताव प्राप्त झाला. म्हाडाच्या प्रस्तावानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पण हा निर्णय घेण्यास दहा महिन्यांचा कालावधी लोटला. या काळात इमारतींचे स्लॅब कोसळले. आता आर्किटेक्ट कधी नेमणार? त्यांचा अहवाल आल्यावर निविदा प्रक्रिया सुरू होणार… त्याला किती वर्षं लागणार, याची चिंता  रहिवाशांना आहे. लोकांचा अंत सरकारने पाहू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावा. हा निर्णय घेताना रहिवाशांना विश्वासात घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

या वसाहतीमधील वीस क्रमांकाच्या इमारतीच्या समस्येकडे अजय चौधरी यांनी लक्ष वेधले. ही इमारत पडायला आली आहे. त्यानंतर या इमारतीचा एकल विकास करण्यासाठी म्हाडाने देकारपत्र दिले. या इमारतीचा पंधराशे स्क्वेअर मीटरचा प्लाँट आहे. त्यावर 500 स्क्वेअर मीटरचा ‘आरजी’चा लेआऊट टाकला आहे.

अभ्युदय नगरमधील रहिवाशांनी माझ्याकडे निवदेन दिले. त्यात त्यांनी सातशे स्क्वेअर फूट घराची मागणी केली आहे. 25 लाख रुपये कॉर्पस फंड मिळावा, प्रत्येकाला कार पार्ंकग, तीस हजार रुपये घरभाडे मिळावे. 33 टक्के जागेवर पुनर्विकास व्हावा, सोयीसुविधा मिळाव्यात, शाळा, रुग्णालय, समाज मंदिर या सुविधाही मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. या वसाहतीमध्ये 100 टक्के मराठी लोक राहतात. अत्यंत मोक्याच्या जागेवर वसाहत आहे. आमच्या स्वप्नातील हे घर आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आर्टिटेक्ट व सल्लागाराची नियुक्ती कधी करणार असा सवाल अजय चौधरी यांनी केला.

या चर्चेला उत्तर देताना अतुल सावे म्हणाले की, वीस क्रमांकाच्या इमारतीच्या लेआऊटच्या समस्येचा पुनर्विचार करू. 51 टक्के लोकांची सही झाल्यावर प्रकल्पाला मान्यता देऊ.