
शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देणारे राज्यातील महायुती सरकार शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना मात्र सपशेल विसरले आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढली असल्याने येणारे भरमसाट बिल भरणे शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध शहरी भागातील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी आणि वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्या 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विविध शहरी भागांत जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.
मध्यमवर्गीयांच्या बेताच्या आर्थिक स्थितीमुळे दरमहा येणारे भरमसाट बिल भरणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांचे सरकार म्हणणाऱ्या महायुती सरकारकडून मात्र शहरी भागातील या गोरगरीबांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. याची दखल घेत शिवसेनेच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई शहरासहित शहरी भागातील जुन्या इमारती व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वीजबिलात सवलत देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
या ठिकाणी होणार आंदोलन
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर