भिडे तोंड आवरा, नाहीतर मिशा कापू; महिलांचा गुरुजींना सज्जड दम

वटपौर्णिमेच्या दिवशी नटय़ा आणि ड्रेस घातलेल्या स्त्रियांनी पुजेला जाऊ नये, असे विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. भिडे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून महिलांनी भिडे गुरुजींना सज्जड दम दिला असून ‘भिडे तोंड आवरा, नाहीतर मिशा कापू’ असा इशारा दिला आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवरून अनेक वेळा वादाचे प्रसंग ओढवत आहेत. अशातच त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. मात्र या वेळी भिडे यांच्या वक्तव्याचा सोलापूर शहरातील विधवा संघटनेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे यांनी निषेध करीत महिलांच्या वतीने त्यांना सज्जड दम दिला आहे. विधवा महिलांसाठी वर्ल्ड ऑफ वुमेन्स संघटनेच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भिडेंना इशारा दिला. भिडे यांनी यापुढे महिलांबद्दल वादग्रस्त विधान करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापून टाकतील, असे म्हटले आहे.

भिडे गुरुजी म्हणाले

 ‘‘वटसाकित्रीच्या पूजेला नटय़ांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनीही जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं,’’ असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. तसेच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले आहेत. मात्र संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे.