
भारतीय जनता पक्षाने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याशिवाय रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत आणि परिणय फुके, पुण्याचे योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले रासप नेते महादेव जानकर हे सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक होते. पण त्यांना संधी मिळालेली नाही. –
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या 11जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 14 जागा सध्या रिक्त आहेत. यामुळे या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येकाला 23 (22.83) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येकी किमान एक जागा निवडून येऊ शकते. मात्र ही निवडणूक गुप्त मतदानाने होते. महविकास आघाडीकडे दोन जागा निवडून आणून बरीच मते शिल्लक राहतात. त्या बळावर त्यांनी तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक चुरशीची होऊ शकते. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ आणि सोबत असलेल्या अपक्षांची संख्या बघता भाजपाच्या पाच, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन जागा निवडून येऊ शकतात.