
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानमधील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने सर्व मर्यादा पार करीत विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. खुद्द पंतप्रधानांनी खालच्या भाषेत टीका केली. हे ऐकून फार दुःख झाले. मात्र आम्ही प्रामाणिक आणि सच्चे असल्यामुळे आम्हाला मोठे यश मिळाले. कारण आम्ही लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षेसाठी ठामपणे उभे आहोत. त्यामुळेच लोकांनी आम्हाला साथ दिल्याचा घणाघात आज शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आयोजित चर्चेत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द मोदींनी शिवसेनेला नकली शिवसेना म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाहक टीका करण्यात आली. संपूर्ण देशात द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आम्हीसुद्धा हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा गर्व आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या धर्मांची घृणा करावी. मात्र सत्ताधाऱ्यांकडून प्रचारात घृणा पसरवून धर्माधर्मात भिंती उभ्या केल्या जात होत्या. मात्र आम्ही जुने विचार उगाळत बसलो नाही. याउलट आम्ही नव्या विचारांनी पुढे जायला हवे, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.