
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. योजनेतील 1300 आजारांपैकी ज्या 131 आजारांचा समावेश सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये नव्हता. त्या सर्व आजारांचा समावेश सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही लागू केला जाणार आहे. दरम्यान, बोगस रुग्ण दाखवून, रुग्णांची नावे देऊन विमा पंपन्या आणि सरकारची खासगी रुग्णालयांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकार लवकरच अँटी फ्रॉड अॅप आणणार आहे. हे अॅप खासगी रुग्णालयातील 25 टक्के आरक्षित बेडवरील सीसीटीव्हीत फिट केले जाईल आणि आमच्या वॉररूममध्ये असेल. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून होणारी फसवणूक रोखली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांनी जन आरोग्य योजनेची व्याती वाढवावी. यात अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करावा, 137 तालुक्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली नाही. ती सुरू करावी. योजनेचा गैरवापर करून खासगी रुग्णालय बोगस रुग्ण आणि बोगस बिले दाखवून विमा पंपन्या आणि सरकारची फसवणूक करत आहेत. ते रोखण्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी तांबे यांनी केली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई गिरकर, सतेज पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.
108 रुग्णवाहिकेला 102चा पर्याय
मोफत वैद्यकीय सेवेसाठी 108 रुग्णवाहिका चालवणाऱया पंत्राटदाराला सरकारने मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे ही सेवा बंद आहे. मात्र ही सेवा बंद असली तरी रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार स्वतः ही सेवा देणार आहे. त्यासाठी 102 ही अॅब्युलन्स सुविधा सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
दातांवर उपचारांचाही समावेश केला जाणार
योजनेत सर्पदंशावरील उपचारांवरील खर्चाची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर दातांवरील उपचारांचाही या योजनेत पहिल्यांदा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर किडनी विकारांवरील खर्चाच्या मर्यादेतही वाढ केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.