आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भोंगळ कारभार, कोर्टाच्या आदेशानंतरही गुणपत्रिकेत चुका

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका डॉक्टर होणाऱया एका विद्यार्थिनीला बसत आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयात तोंडघशी पडल्यानंतरही या विद्यापीठाने गुणपत्रिका जारी करताना चुका ठेवल्या आहेत. भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनीने पुन्हा हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. नव्याने गुणपत्रिका जारी करण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला द्यावेत, अशी मागणी विद्यार्थिनीने केली आहे.

समृद्धी अंबेरकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. एमबीबीएसच्या तृतीय वर्ष परीक्षेत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विषयाच्या प्रॅक्टिकलमध्ये समृद्धी नापास झाली. अनपेक्षित गुण मिळाल्याने तिने त्याचा पाठपुरावा केला. पदरी निराशा पडली. अखेर समृद्धीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. समृद्धीची नव्याने प्रॅक्टिकल घेण्यात आली. त्याचा रिझल्ट बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर झाला. नव्याने घेण्यात आलेल्या परीक्षेत समृद्धीला 133 गुण मिळाले.

समृद्धीला नव्याने गुणपत्रिका देण्याचे आदेश न्या. अतुल चांदुरकर व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले. नव्याने घेतलेल्या परीक्षेत मिळालेले गुण हे तिने आधी दिलेल्या परीक्षेचे असल्याचे ग्राह्य धरून नवीन गुणपत्रिका द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. तरीदेखील विद्यापीठाने समृद्धीच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी’ असा उल्लेख केला. धक्कादायक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असतानाही तेथे दाखल असलेल्या अपील याचिकेवर या निकालपत्राचे भवितव्य असेल, अशी नोंद रिझल्टवर करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशानुसार रिझल्ट जारी न झाल्याने समृद्धीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. पुरवणी व सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख रिझल्टमधून वगळून नव्याने गुणपत्रिका देण्याची मागणी समृद्धीने केली आहे. यातही वेळकाढूपणा करत विद्यापीठाने प्रत्युत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. यावरील पुढील सुनावणी 18 जुलै 2024 रोजी होणार आहे.

नापास झाल्याचा डाग

समृद्धीने गेल्या वर्षी परीक्षा दिली होती. मार्च 2024 मध्ये त्याचा रिझल्ट जाहीर झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने परीक्षा देऊनही तिच्या गुणपत्रिकेवर हिवाळी परीक्षा-2023 (पुरवणी) असे नमूद आहे. नापास झाल्यामुळे घेण्यात येणाऱया पुरवणी परीक्षेची ही गुणपत्रिका आहे, असा त्याचा अर्थ होता. मुळात आधीच्या गुणांवर शंका असल्याने तिची नव्याने परीक्षा झाली. नव्याने घेतलेल्या प्रॅक्टिकलचे गुण हे आधीच्या परीक्षेचाच आहेत असे ग्राह्य धरून गुणपत्रिका द्या, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीही पुरवणीचा उल्लेख गुणपत्रिकेवर आहे. याने समृद्धी नापास झाली होती असाच समज होतो. भविष्यात नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी अर्ज करताना समृद्धीला अडचण होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

नोंदणी करण्याआधी रिझल्ट आवश्यक

डॉक्टर म्हणून समृद्धीला नोंदणी करायची आहे. या नोंदणीची मुदत काही दिवसांत संपणार आहे. त्याआधी विद्यापीठाने सुधारित गुणपत्रिका जारी करणे आवश्यक आहे.