हिंदुस्थानी महिलांचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

हिंदुस्थानच्या महिला संघाने एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर दहा फलंदाज राखून मोठा विजय मिळविला. शेफाली वर्माचे द्विशतक, स्मृती मानधनाचे शतक आणि स्नेह राणाचे पहिल्या डावातील 8 बळी ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. दोन्ही डावांत मिळून दहा बळी टिपणारी स्नेह राणा या विजयाची शिल्पकार ठरली. हिंदुस्थानी महिलांनी 6 बाद 603 धावसंख्येवर आपला डाव घोषित करून दक्षिण आफ्रिकेला 84.3 षटकांत 266 धावांवर रोखून पहिल्या डावात 337 धावांची आघाडी घेत पाहुण्या संघावर फॉलोऑन लादला. कारण दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी पहिल्या डावात 403 धावांची गरज होती. मात्र. दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 154.4 षटकांत 373 धावसंख्या उभारून हिंदुस्थानला डावाने विजय मिळू दिला नाही. कर्णधार लॉरा वोल्वार्ड (122 धावा) व सुने लुस (109) यांनी झुंजार शतके ठोकली. मात्र, हिंदुस्थानला दुसऱया डावात कसोटी जिंकण्यासाठी केवळ 37 धावांचे लक्ष्य मिळाले.