धाडस जीवावर बेतलं, फेसाळणाऱ्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

लोणावळ्यातील भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता दोन दिवसांपूर्वी पुण्यातील ताम्हणी घाटातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथील एका फेसाळणाऱ्या धबधब्यात उडी मारणारा तरुण वाहून गेला होता. सोमवारी तब्बल दोन दिवसांनी त्याचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. स्वप्नील धावडे असे त्या तरुणाचे नाव असून तो मूळचा पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरातील रहिवासी आहे.

स्वप्नील धावडे हा तरुण त्याच्या जिममधील 32 जणांच्या ग्रृपसोबत ताम्हिणी घाटात पिकनिकला आले होते. ताम्हिणी घाटात असलेल्या कुंडात डोंगरातून येणाऱ्या धबधब्यांचे पाणी पडत असते. मुसळधार पावसामुळे हे धबधबे ओसंडून वाहत होते. पाण्याचा प्रवाह जास्त असताना देखील स्वप्निलने पाण्यात उडी घेतली. सुरुवातीला त्याने कुंडाच्या भिंतीना पकडून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोर इतका जास्त होता की त्याच्यापुढे स्वप्निलचा निभाव लागला नाही व तो प्रवाहासोबत वाहून गेला.

स्वप्निल धावडे हा बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळला होता. तो हिंदुस्थानी सैन्यात देखील होता. तब्बल18 वर्ष लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या वर्षी तो निवृत्त झाला होता. स्वप्निलची पत्नी पिपंरी चिंचवड पोलीस दलात आहे.