राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर शायरीतून सडकून टीका केली. ‘कभी घमंड मत करना, तकदीर बदलती रहती है. शीशा वही रहता है, तस्वीर बदलती रहती है’, असे म्हणत खरगे यांनी हल्लाबोल केला. पीएम मोदी आणि भाजपच्या 400 पारच्या घोषणेचाही खरगे यांनी समाचार घेतला. 400 पारच्या घोषणा दिल्या गेल्या, पण निवडणुकीचा निकाल तुमच्या विरोधात लागला, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.
2024 ची निवडणूक ही अंहकार मोडून काढणारी होती. गेल्या सरकारमधील 17 मंत्र्यांचा निवडणुकीत पराभव झाला. शेतकऱ्यांना जीपने चिरडणाऱ्या मंत्र्याला हटवा, आशी मागणी आम्ही केली होती. आता जनतेनेच निवडणुकीत त्यांना चिरडलं आणि संपवलं. एका शायरने म्हटलं आहे – घमंड मत करना, तकदीर बदलती रहती है…शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है. असेच भाषण दिले गेले होते. आम्हाला अहंकारी म्हटले होते. पण आता यांचाच अहंकार मोडून काढण्यात आला आहे, असा घणाघात खरगे यांनी केला.
आता 400 पारची घोषणा देण्याची गरज पडणार नाही. तुम्ही 200 पार मध्ये आहात. या जागाही मोठ्या कष्टाने आल्या. भाजप केवळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करतो. आम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा पंतप्रधान मोदी म्हशींबद्दल बोलतात. देशाचे विभाजन करण्याच्या भाजपच्या विचारधारेवर बोलतो तेव्हा मोदी मुघल आणि औरंगजेबबद्दल बोलतात, असा टोला खरगे यांनी लगावला.
पेपर लीक आणि बेरोजगारीबद्दल बोलतो तेव्हा मोदी मंगळसूत्र आणि मुजऱ्याबद्दल बोलतात. महागाईबद्दल बोलतो तेव्हा भाजप परदेशातील महागाईबद्दल बोलू लागतो. विरोधक जनतेबद्दल बोलतात तेव्हा मोदी त्यांच्या मनातले बोलू लागतात. ते फक्त त्यांच्या मनातलं बोलण्यात व्यग्र आहेत. पंतप्रधान मोदींनी आजच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. इतिहासात जे घडले त्याला उत्तर देण्यास जनता सक्षम आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुनावले.