पाच गुंतवणूकदारांना ‘फॉरेक्स शेअर मार्केट’मध्ये अमाप पैसे कमावल्याची बतावणी करून उचगाव (ता. करवीर) येथील ‘ब्राइट बुल ट्रेडिंग ऍण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि.’ येथे ट्रेनिंग देऊन जादा परताव्याचे आमिष दाखवीत सव्वा कोटी रुपयांना गंडा घालणाऱया सहाजणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष शिवाजी कांबळे (रा. वाकरे, ता. करवीर), सयाजी जिन्नाप्पा भोसले, रोहन जिन्नाप्पा भोसले, शिवाज जिन्नाप्पा भोसले (तिघे रा. वळिवडे, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर आकाश शिवाजी कांबळे, शिवाजी पांडुरंग कांबळे (दोघेही रा. वाकरे, ता. करवीर) हे फरार आहेत.
फॉरेक्स शेअर मार्केट ट्रेडिंग करीत असल्याचे सांगत संशयितांनी उचगाव येथील ब्राइट बुल ट्रेडिंग ऍण्ड इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. कंपनीमध्ये फसगत झालेल्या पाचजणांसह काहीजणांना शेअर मार्केटचे ट्रेनिंग दिले. या माध्यमातून अमाप पैसे कमावल्याची बतावणी करीत महागडय़ा गाडय़ा, ब्रॅण्डेड कपडे, परदेशात जाणे-येणे असा दिखावा करून ट्रेनिंगला आलेल्या लोकांना भुलविले.
फिर्यादी रवींद्र यशवंत कामत (रा. सुतारमळा, कोल्हापूर) यांना महिन्याला पाच ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच कामत, त्यांची पत्नी व इतर तिघांना कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कामत व त्याच्या पत्नीसह अन्य तीनजणांकडून एक कोटी 12 लाख 97 हजार रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली. जून 2022 ते जून 2024पर्यंत कोणताही परतावा अगर गुंतविलेली रक्कम या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळाली नाही. त्यामुळे रवींद्र कामत यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.