घरगुती गणेशमूर्ती बनवणाऱया मूर्तिकारांना मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सव काळात मोफत शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गणेशमूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्याची जोरदार मागणी केली होती तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहातही प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शाडूची माती मोफत देण्याची मागणी मान्य करत तसे आदेश पालिका आयुक्तांना देत असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे पर्यावरण जपण्यात शिवसेनेचाही हातभार लागणार आहे.
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची मोठी धामधूम असते. मुंबईत दोन महिने आधीच गणेशमूर्ती बनवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून कलाकार येतात. मूर्ती बनवायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी महापालिका प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालतात. त्यामुळे मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पर्यावरण जपण्याबरोबर मूर्तिकारांचे नुकसान होऊ नये यासाठी गणेश मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेकडे पत्र लिहून केली आहे.
मुंबईतील जल प्रदूषण कमी होणार
गणेशोत्सव काळात मुंबईत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांनी शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात, असे आवाहन वारंवार केले जाते. मात्र, मूर्तिकारांना शाडूची माती विकत घेण्यासाठी कोणतीही सवलत दिली जात नाही, प्रोत्साहनात्मक उपाय केले जात नाहीत. त्यामुळे मूर्तिकार नाइलाजाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती घडवतात, मात्र आता मूर्तिकारांना महापालिकेकडून शाडूची माती मोफत उपलब्ध होणार असल्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबईतील जल प्रदूषणालाही आळा बसणार आहे.