प्रत्येक रामभक्ताने भाजपला किंवा मोदींनाच मत दिले असेल अशी प्रसिद्धी करताना भाजप नेते दिसतात. परंतु, आता भाजपच्या या वृत्तीवर भाजप नेत्या उमा भारती यांनीच परखड मत व्यक्त केले आहे. प्रत्येक रामभक्ताचे मत आपल्यालाच मिळेल हा अहंकार असून भाजपने तो बाळगायला नको. हा विचारही चुकीचा आहे की जो आपल्याला मत देत नाही तो रामभक्त नाही, अशी प्रतिक्रीया उमा भारती यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
इस्लाम मानणारे लोक हे सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था एकच आहे अशा दृष्टीने देशाकडे पहातात. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेप्रमाणे त्या वर्गाचे मतदान होते. उत्तर प्रदेशात भाजपला अपयश आले याचा अर्थ असा होत नाही की, लोकांची रामावरची श्रद्धा कमी झाली, असेही उमा भारती यांनी म्हटले आहे. भाजपला अहंकार आला आहे असे मला वाटते. आम्ही पराभवाचे चिंतन करत आहोत, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी कधीही स्वतःला पंतप्रधान म्हटलेले नाही ते स्वतःचा उल्लेख प्रधानसेवक असा करतात. विकासाच्या अजेंडय़ावर ते काम करत आहेत, असा सावध पवित्राही उमा भारती यांनी घेतला.