
अर्जुनाचे जसे माशाच्या डोळ्यावर लक्ष होते तसेच महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभेला कम्युनिस्ट पार्टी, शेकाप आणि अन्य लहान मित्रपक्षांना जागा देता आल्या नव्हत्या. परंतु मित्रपक्षांच्या हिताचीही जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनाही आगामी विधानसभा निवडणुकीत जागा देणार आहोत, असे शरद पवार म्हणाले.
तीन महिन्यांत जोरदार मोर्चेबांधणी करू
विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने बाकी आहेत. त्या तीन महिन्यांत महाविकास आघाडी जोरदार मोर्चेबांधणी करेल, असेही शरद पवार म्हणाले. सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज असून जनतेची ती गरज भागवणे, त्यासाठी उचित भूमिका पार पाडणे हे आमचे कर्तव्य आहे, असे ते पुढे म्हणाले.
जागा वाटपाबाबत लवकरच चर्चा
विधानसभेतील जागा वाटपाबाबत अद्याप कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. प्रमुख पक्षांमध्ये लवकरच त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल आणि जागा वाटपानंतर संबंधित पक्षाने आपले उमेदवार निश्चित करून निवडणुकीच्या कामाला लागायचे आहे, असे पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना केला. त्यावर, आघाडीतील पक्षांचा सामुहिक चेहरा लोकांसमोर ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत, असे शरद पवार म्हणाले.
निवडणुकांमुळे लाडकी बहीण-भाऊ आठवले
विधानसभा निवडणुका जवळ येताच सरकारला लाडकी बहीण-भाऊ वैगरे आठवायला लागले आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष-खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अर्थमंत्री अजित पवार यांना लगावला. उशिरा का होईना सरकारला जाग आली असली तरी या योजनेत अनेक त्रुटी आहेत ज्यांचा आम्ही अभ्यास करतोय, असे त्या म्हणाल्या. निवडणुका आल्या की असे चुनावी जुमले येतच असतात असे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी सदानंद सुळे यांच्यासह आज दापोडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संकाद साधला.