हडपसर पोलिसांकडून 12 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत; ‘लाखमोला’चा मुद्देमाल मिळाल्याने फुलले चेहरे

आपल्याकडील एखाद्या वस्तूची चोरी झाल्यावर मनस्ताप होतो. हडपसरमध्ये दिवसरात्र कष्ट करून जमविलेली रक्कम, मोठ्या हौशेने खरेदी केलेले दागिने, मोबाईल चोरीला गेले होते. ते परत मिळतील की नाही याची नागरिकांना चिंता होती. हडपसर पोलिसांनी चोरीला गेलेला 12 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करून नागरिकांना परत केला. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यांवर एक वेगळाच आनंद दिसून आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

घरफोडी, फसवणूक, सोनसाखळी चोरी अशा विविध 10 गुन्ह्यातील जप्त केलेला 12 लाख 32 हजारांचा मुद्देमाल सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आला. यावेळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक मंगल मोढवे आदी उपस्थित होते. शहर परिसरात घरफोडी, फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यातही शहरातील परिमंडळ पाचच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांचे प्रमाण मोठे आहे. हद्द मोठी असल्याने घडणाऱ्या घटनाही जास्त आहेत. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी अशा घटना घडून यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत. या घटनांचा प्राधान्याने तपास करून हडपसर पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.