T20 WC Final : क्लासनची विकेट, बुमराहचं षटक अन् सूर्याचा अविश्वसनीय झेल; विश्वविजयातील ‘टर्निंग पॉईंट’चं मोदींकडूनही कौतुक

टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेचा संघ 169 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ह्रदयाचे ठोके वाढवणाऱ्या या लढतीत तीन महत्त्वाचे टर्निंग पॉईंट ठरले.

कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये हा निर्णय टीम इंडियाच्या अंगलट आला. रोहित शर्मा 5 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत भोपळाही फोडू शकला नाही. पाठोपाठ सूर्यकुमार यादवही आल्यापावली माघारी परतला. यामुळे टीम इंडियाचा डाव संकटात सापडला.

कोहली-अक्षरने सावरले

तीन विकेट्स झटपट गमावल्याने संकटात सापडलेला डाव विराट कोहली आणि अक्षर पटेल या जोडीने सावरला. दोघांत 54 चेंडूत 72 धावांची भागिदारी झाली. डिकॉकच्या एका अप्रतिम थ्रोवर अक्षर धावबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 31 चेंडूत 47 धावा केल्या, तर विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

क्लासनचे फटकेबाजी अन् हार्दिकचा ब्रेक थ्रू

धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवातही खराब झालेली. आफ्रिकेने 12 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर स्टब्स आणि डिकॉकने अर्धशतकीय भागिदारी केली. स्टब्स आणि डिकॉक बाद झाल्यानंतर क्लासनचे वादळ घोंगावले. त्याने 27 चेंडूत 52 धावा चोपल्या. अक्षर पटेलच्या एका षटकात त्याने 24 धावा कुटत सामना आफ्रिकेच्या बाजुने झुकवला. मात्र पांड्याने यष्टीमागे झेलबाद करत त्याचा अडसर दूर केला.

बुमराह-अर्शदीपची कंजुस गोलंदाजी

या लढतीत टीम इंडियाचे फिरकीची जादू चालली नाही. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाचा आफ्रिकेच्या फलंदाजांनी समाचार घेतला. मात्र बुमराह, पंड्या आणि अर्शदीप या वेगवान तिकडीने आफ्रिकेला वेसन घातले. 18व्या षटकात बुमराहने फक्त दोन धावा दिल्या, त्यानंतर 19व्या षटकात अर्शदीपने 4 धावा दिल्या. यामुळे अखेरच्या षटकात आफ्रिकेला 6 चेंडूत 16 धावा असे समिकरण झाले.

T20 WC 2024 : हिंदुस्थानचा ऐतिहासिक विजय; सेलिब्रेटींचाही आनंद गगनात मावेना! सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सूर्याचा झेल

अखेरच्या षटकात चेंडू पंड्याकडे, तर स्ट्राईक किलर मिलरकडे होती. एक षटकार अन् सामना आफ्रिकेच्या खिशात अशी परिस्थिती होती. पंड्याने फुलटॉस टाकला, चेंडू हवेत गेला अन् क्रीडाप्रेमींची धडधड वाढली. षटकार जातोय असे वाटत असताना सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने अफलातून कॅच घेतला. सूर्याने कॅच नाही तर सामना खेचला. यानंतर पंड्याने अधिक धावा न देता टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोदींकडून कौतुक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकप विजेत्या संघाशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी रोहित शर्माच्या कॅप्टनसीचे, विराट कोहलीच्या फायनलमधील खेळीचे, पंड्याच्या अंतिम षटकाचे, सूर्यकुमार यादवच्या कॅचचे आणि जसप्रीत बुमराह दिलेल्या योगदानाचेही कौतुक केले.