आपल्या देशात हे चाललंय काय? राममंदिरापाठोपाठ अयोध्येत रुग्णालयातही पाणी तुंबले!

एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून देशात सगळंच कोसळतंय… ढासळतयं… अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहाचे छत पहिल्याच पावसात गळू लागल्यानंतर आता श्रीराम रुग्णालयातही गुडघाभर पाणी साचल्याचे समोर आले आहे. भाविक, स्थानिकांना गुडघाभर पाण्यातूनच वाट काढत रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे रामनगरीच्या विकासाची पोलखोल होत आहे. दुसरीकडे दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ आणि जबलपूर विमानतळाचे छत कोसळल्यानंतर आज गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत कोसळल्याची घटना घडली. या एकामागोमाग एक घडत असलेल्या दुर्घटनांमुळे या देशात चाललेय काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

राम मंदिरातील अभिषेक सोहळय़ाआधी शहरात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांधकाम करण्यात आले होते. या सगळय़ा बांधकामांसाठी हा पहिलाच पावसाळा असून दुर्दैवाने अनेक बांधकामांना पावसाचा फटका बसल्याचे चित्र आहे. आज सकाळीच पीटीआयने श्रीराम रुग्णालयातील परिसराचे विदारक चित्र व्हिडीओद्वारे शेअर केले.

दिल्ली-जबलपूरनंतर राजकोट विमानतळाचे छतही कोसळले

दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ आणि जबलपूर विमानतळाचे छत कोसळल्यानंतर आज गुजरातमधील राजकोट विमानतळाच्या पीकअप ड्रॉप पॉइंटचे  छत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या ठिकाणी कुणीच नसल्यामुळे जीवितहानी टळली. तीन दिवसांत ही तिसरी घटना घडली असून राजकोटमध्येही एनडीए सरकारकडून झालेली उद्घाटनाची घाईच भोवल्याचे उघड झाले आहे. पावसाळय़ाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी छताचे बांधकाम करण्यात आले होते. तसेच हे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होते ही बाबही प्रामुख्याने समोर आली आहे.

राजकोट शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गेल्या वर्षी 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. 1,405 कोटी रुपये खर्चून 23 हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात आलेल्या या विमानतळाची दर तासाला 1,280 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता आहे. तब्बल 140 कोटी रुपये खर्चून या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.

तीन दिवसांत तीन अपघात

जबलपूरमधील हुमना विमानतळाचे छत गुरुवारी एका अधिकाऱ्याच्या गाडीवर पडले. गाडीचे छत पूर्णपणे तुटले. छत पडण्याच्या 10 मिनिटांपूर्वीच चालक गाडीतून बाहेर पडला होता. त्यामुळे तो बचावला. विमानतळ प्रााधिकरणाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. 450 कोटी रुपये खर्चून डुमना विमानतळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल–1 मधील पार्किंगचे छत  कोसळले. या अपघातात कारमध्ये बसलेल्या कॅब चालकाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

मोदी यांचा छप्परफाड विकास

जबलपूर, दिल्ली आणि राजकोट अशा तीन ठिकाणी विमानतळाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एनडीए सरकारवर ‘एक्स’वरून जोरदार निशाणा साधला आहे. तीनही घटनांची तारीख उद्घाटनाच्या तारखांसह काँग्रेसने एनडीए सरकारचे कारनामे शेअर केले आहेत. जबलपूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे 10 मार्च 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. दिल्लीतील टी वन टर्मिनलच्या विस्तारीकरणाचेही 10 मार्च 2024 रोजी उद्घाटन झाले होते तर राजकोट विमानतळाच्या विस्तारीकरणाचे 27 जुलै 2023 रोजी उद्घाटन झाले होते. या घटनांनी मोदी यांनी हॅटट्रिक साधल्याची घणाघाती टीकाही काँग्रेसने केली आहे.

मंदिरात पूजा करणे कठीण

रामलल्लाची मूर्ती ज्या गाभाऱ्यात ठेवली आहे तिथेही पहिल्या पावसात गळती सुरू झाली. केवळ गाभाऱ्यातच नाही तर अनेक ठिकाणी गळती होत आहे. या गळतीची चौकशी होणे गरजेचे आहे. बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली याची माहिती घेणे आवश्यक असून यावर उपाययोजना केल्या नाहीत तर मंदिरात पूजा करणे कठीण होईल, असे महंत सत्येंद्र दास यांनी म्हटले होते.